जनरल डबा

Daughter of India…

ओळखलंत का.? नाही? मी ज्योती सिंग पांडे, कदाचित अजूनही नसेल ओळखलं. अहो मी तुमची ‘निर्भया’! हं बरोबर! निर्भया म्हटल्यावर अगदी बरोबर ओळखलंत. तीच निर्भया जिच्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात. तिला न्याय मिळावा म्हणून लढलात, झगडलात, आक्रोश केलात! त्याच निर्भयाला म्हणजेच मला तुमच्याशी आज थोडं बोलायचं आहे. हो! बोलायचं आहे. आता मी बोलणार म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि ते वाटण अगदी साहजिक आहे. तुम्ही म्हणाल “काळाच्या पडद्याआड गेलेले लोक असे कसे बोलू शकतात?” 

अगदी बरोबर आहे तुमचं. नाहीच बोलू शकत! पण जिवंत लोकांनी जो विकृतपणाचा उत्पात मातून ठेवलाय तो पाहून पाषाणालाही वाचा फुटावी! मी तर कालवंश होऊन सुद्धा तुमच्या आठवणीत का होईना पण जिवंत आहे. आहे ना? म्हणून आज मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि हो काळजी करू नका मी काही शाब्दिक टोमणे देणार नाही आणि तुम्हाला ज्ञान वगैरे देण्याचाही माझा मुळीच हेतू नाही खरंतर ते मलाही आवडणार नाही. मला आज फक्त माझ्या बद्दल बोलायचं आहे! माझ्या साठी बोलायचं आहे! मला माझं मन हलकं करायचं आहे आणि म्हणून मला बोलायचं आहे. कुणीतरी म्हटलं आहे “मन मोकळं झाल्या शिवाय मुक्त झाल्या सारख वाटत नाही” आणि आज मला मुक्त व्हायचं आहे म्हणून मला मोकळ्या मनाने बोलायचं आहे. खरंतर सुरवात कुठून आणि कशी करू कळतच नाही. तो काळा दिवस आठवला तरी काळीज चरचर फाटत जातं, डोक्यात प्रलय उठतो आणि शेवटी मन छिन्न विच्छिन्न होऊन कोलमडून पडतं. त्या रात्रीचा तो क्षण टळला असता तर? तर ‘निर्भया’ हे नाव कदाचित जन्मालाच आलं नसत!

कुणी मला ‘निर्भया’ म्हटलंय तर कुणी ‘दामिनी’. पण खरं सांगू? हे अगदी चुकीचं नाव दिलं मला. मी निर्भया नाहीच! मी तर खुप भित्री आहे. इतकी भीत्री की जीवनाच्या शेवटच्या क्षणाला मला माझाच चेहरा आरशात पाहण्याची भीती वाटत होती. तुम्हाला काय वाटतं; निर्भया वाचू शकत नव्हती? नक्की वाचली असती पण मी घाबरले जगायला. हो मी घाबरले कारण मला प्रत्येक चेहऱ्या मागे आता एक विकृत पुरुषी दानव दिसत होता, सतत हसणाऱ्या राक्षशी आवाजाने माझ्या कानठळ्या बसत होत्या, दारूने वासाडलेल्या तोंडाचा घाणेरडा दर्प माझ्या नाकात सारखा फिरत होता, मी शुद्धीवर नसले तरी मला माझ्याच किंचाळण्याचा आवाज सारखा ऐकायला येत होता, माझे हातपाय पाण्यातून काढलेल्या मासोळी सारखे तडफडत होते, माझे डोळे बंद असले तरी ते सारखे भिरभिरत होते की कुणीतरी माझ्या मदतीला येईल; पण कुणीच नाही आलं! आणि शेवटी होत्याचं नव्हतं झालं. विचार करा इच्छा नसतात तुम्हाला तुमच्या अंगावर सतत कुणाचीतरी स्पर्श जाणवतो, जिवंतपणे तुमच्या गुप्तांगात एक रॉड टाकून तुमच्या आतड्याचे लचके मेलेल्या प्राण्यागत ओढून बाहेर काढले जातात! हे सगळं तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसतंय! तो त्रास जाणवतोय. फक्त जाणवत नाही तर आता अनावर होतोय तरी तुम्ही काहीच करू शकत नाही शिवाय अंगातली शक्ती संपे पर्यत विरोध करण्याच्या. तरी तेरा दिवस! तेरा दिवस मी जिवंत राहिले हा त्रास आणि गिल्ट घेऊन पण एक क्षण अनावर झाला आणि अलगद प्राण सोडला. जर मी तेरा दिवसात सहा पत्र लिहु शकते, जरी मी बोलू शकत नसले तरी पत्र लिहण्या इतपत सशक्त आणि भानावर होते तर मी वाचू शकले नसते? अहो आपलं वैद्यकीय क्षेत्र एव्हढही मागे नाही. कारण माझ्यापेक्षा गंभीर अपघात झालेले कित्येक लोक वाचतात. मग मी का नाही वाचले? कारण माझीच इच्छाशक्ती संपली जगण्याची! मी घाबरले! हो हो मी म्हणजे तुमची ‘निर्भया’ घाबरली.
आणि बर झालं मी वाचले नाही; जर मी वाचले असते तर शारीरिक दुःखा नंतर बोचणाऱ्या नजरा झेलण्याचं सामर्थ्य कदापि नसतं आलं माझ्या अंगात.!
कधी कधी हसायला येतं मला, किती विचित्र असतं न हे आयुष्य. डॉक्टर व्हायचं होत मला मोठं होऊन गरजू लोकांचे ईलाज करायचे होते पण मला कुठे माहीत होतं की माझं स्वप्न पूर्ण होण्या आधी एक दिवस मलाच ह्या विचित्र विकृत महाकाय ईलाजाची गरज पडेल व त्यात डॉक्टरही अक्षम होतील अन माझं स्वप्न स्वप्नच राहील. असो, मुळात चूक माझीच आहे! काय गरज होती मला एव्हढ्या रात्री घरा बाहेर जाण्याची? कुणी सांगितलं होतं मेकअप करायला? का मी मॉडर्न कपडे घातले? का मी आपल्या समाजाच्या काही मर्यादांचा उंबरठा ओलांडला? ही चूक माझीच आहे आणि त्याचीच शिक्षा मिळाली मला, कारण डोक्यावर ओढणी घेऊन संस्कारी पद्धतीने वागणाऱ्या मुलींवर भारतात कधीच बलात्कार होतच नाहीत! हो नं?? माझ्यापेक्षा वयाने लहान फ्रॉक घालून भातुकलीचे खेळ खेळणाऱ्या निर्दोष मुलींना ‘संस्कार’ शब्दाचा अर्थ सुद्धा माहीत नसतो! त्यांच्यावर बलात्कार होत नाहीत का? तरी चूक मुलींचीच कारण मुलींनी रात्री अपरात्री असं घरा बाहेर पडूच नये आणि म्हणून मला वाटतं चूक माझीच आहे. अशा वातावरणात जगण्या पेक्षा मेलेलं बर! सगळे स्वप्न, इच्छा मारून टाकल्या. मनातल्या काही इच्छा अपेक्षा जमतील तश्या कागदावर लिहून ठेवल्या आणि २९ डिसेंबर २०१२ ला रात्री ०२:०० च्या सुमारास सिंगापूरच्या माउन्ट एलिजाबेथ हॉस्पिटलमध्ये सुटकेचा श्वास घेतला. जिवंत राहून काय करणार? आपल्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला कायम नजरे समोर पाहून माझ्यातली ‘मी’ कशी जिवंत राहिले असते? स्वतःबद्दल लोकांच्या तोंडून कुजबुज ऐकून कशी जिवंत राहिले असते? एव्हढं सगळं होऊन जरी वाचले तरी आजन्म माझ्याच आई बाबांच्या नजरेत नजर देऊन पाहण्याची हिम्मत कुठून आणू? त्यापेक्षा न जगलेलच बर!
मुद्दा हा नाही की कायदा बदलावा,
मुद्दा हाही नाही की आरोपींना काय शिक्षा मिळावी. राजकारण आणि जातीवाद यावरही बोलण्याचाही माझा हेतू नाही पण माणसाने मानसिकता बदलली तर काहीच बदलायची गरज पडणार नाही. १६ डिसेंबर २०१२ (रात्री०१:३०) ला आज पाच वर्षे पूर्ण झाले. आज पासून पाच वर्षां पूर्वी ह्या क्षणाला मी दिल्लीच्या ओयोसिस हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होते आणि माझी ओळख लपवण्यासाठी म्हणून मला ‘निर्भया’ नाव देण्यात आलं. “Daughter of India” झाले पण जरा उशिराच! हा दिवस सोशल मीडिया पासून तर दिल्ली गेट पर्यत कॅन्ड़ल च्या प्रकाशात शांत तेजोमय केला जातो पण जरा उशीराच! लोकांना जाणीव होते पण जरा उशिराच! वेळ आणि व्यक्ती एकदा निघून गेल्या की परत येत नाहीत. कुणाला हौस नसते निर्भया होण्याची; माझ्या आधी आणि माझ्या नंतर अश्या कित्येक निर्भया झाल्या ज्यांनी ह्या शारीरिक आणि मानसिक वेदना भोगल्या आहेत. कित्येक निर्भया आजही हा त्रास घेऊन क्षणोक्षणी मरतायत त्यांना गरज आहे तुमच्या अपुलकीची. माझ्या आई बाबा प्रमाणे त्यांचे सुद्धा आई बाबा न्यायासाठी कोर्टाच्या खेट्या घालत आहेत हे नाही बघवत. मुलीला देवी म्हणून पूजलं नाही तरी चालेल पण खेळणं म्हणून खेळून मोडून तोडून फेकल्या जाऊ नये. कारण प्रत्येक मुलीला एक डॉक्टर, इंजिनिअर, पायलट किंवा हाउस वाईफ व्हायचं असतं त्यांना निर्भया नामक कलंक लागायला नको.

ह्यावर कीतीही बोलल तरी कमी पण माझ्या आयुष्या सारखा ह्या शब्दानांही कुठे तरी शेवटचा पूर्णविराम द्यावाच लागणार. प्रकृतीचा नियम आहे प्रत्येक गोष्टीचा शेवट अटळ आहे पण तो कुणाचाच असा काळा नसावा हीच अपेक्षा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *