जनरल डबा

आणि गंमत म्हणजे तुला ठाऊकही नाही!

NEW – AUDIO BLOG – NEW

वेळेचा अपव्यय मला मुळीच आवडत नाही. पण आज बस उशिरा आलेली चालेल मला; चालेल काय अगदी आवडेल! कारण इथे बसस्टँडवर तू आली आहेस ना, लुकलुकणाऱ्या पापण्यांमागे भिरभिरणारी नजर घेऊन! बेभान कोसळणाऱ्या पावसाच्या सरी चेहऱ्यावर झेलत तू जेव्हा निश्चिंत होऊन दोन्ही दिशांना हात पसरवले होतेस तेव्हा तुला पाहून असं वाटलं की जगातली सारी दुःख, सारी संकटं कायमची संपली आहेत. देवाच्याही मनात काय चाललंय कुणास ठाऊक, पण सबंध बसस्टँड सोडून तू माझ्याच शेजारी येऊन उभं रहावं हा नियतीचा घात समजू की, नशिबाने मिळालेला क्षणिक आनंद हेच कळत नाही. मी पाहतोय तुला, अगदी टिपतोय डोळ्यांमध्ये तुझं हसणं, बोलणं, ओरडणं, तुझे हलणारे इयररिंग्स, केसांतून टपटप गळणारं पाणी आणि तुझ्या माझ्यामधलं हे अंतर! सगळं काही पाहतोय पण तुझ्या नकळत. अधूनमधून भीतीही वाटतेय तुझ्याशी नजरानजर होण्याची. कारण त्या अथांग डोळ्यांत बुडालो तर कदाचित शुद्धच राहणार नाही मला.

तुला एक सांगू, हा पावसाळा कालपर्यंत माझ्यासाठी अगदी कंटाळवाणा होता. चिखलाने बरबटलेले रस्ते, डबक्यांमध्ये साचलेलं पाणी, पँट्स वर करून धावणारे लोक, पाण्याचे लोट उडवत धावणाऱ्या गाड्या; किती किळसवाणं आहे हे सगळं. या सगळ्यांमध्ये अचानक तुझ्या समोर येण्याने माझा हा विचार डगमगायला लागलाय. मला पावसाळा आवडायला तर लागला नसेल ना? तुझ्यामुळे? कोण आहेस तू? नाव काय आहे तुझं? राग नको येऊ देऊस पण एक सांगायचंय तुला, ‘ही अशी तू ओलीचिंब होऊन आता शहारली आहेस ना, हे पाहवत नाही मला. वाटतंय धरावा तुझा हात घट्ट आणि घेऊन जावं तुला परत त्याच पावसात, परत पाहावं थेंबांना तुझ्या चेहऱ्यावर पडताना आणि अलगद ओघळतांना, बहाणा मिळेल मला तुला जवळून न्याहाळण्याचा. यदाकदाचित मी भानावर आलोच तर तिथून तडक तुला समोरच्या चहाच्या टपरीवर घेऊन जाईल. दोन कटींग सांगून बरबटलेल्या चिखलात उभा राहून तुझ्याकडे पाहीन. आता माझ्याकडे संधी असेल तुझ्या केसांतून गळणाऱ्या पाण्याला हातावर झेलण्याची, विस्कटलेल्या बटांना कानामागे हळूच सावरून ठेवण्याची. तोवर चहा येईलच, गरम गरम चहाच्या पेल्यावर ओठ ठेऊन तू फुंकर मार, मी डोळे बंद करून अलगद झेलीन ती माझ्या काळजावरच्या जुन्या-पुराण्या दुःखांवर. परत निघण्याची इच्छा नसतांना विचारांमध्ये तुला कुठवर घेऊन जाऊ असा विचार करत मी परत येतो आपल्या जागेवर. तू तिथेच असतेस माझ्या शेजारी उभी. पण आता शेजारी असूनही जास्त वाटू लागतं तुझ्या माझ्यातलं हे अंतर! बोचतंय मला ते म्हणून मला ते अजून कमी करावसं वाटतंय.

आता मात्र मी थोडा ओशाळलोय, विचारांत का होईना, तुझ्यासोबत भिजून नखशिखांत गारठलोय. तुझ्या माझ्यातलं हे अंतर कमी करण्यासाठी मी माझे पाय हळूच तुझ्या बाजूने सरकवतोय, पण तुला कळणार नाही याचीही काळजी घेतोय. परत एकदा विचारांमध्ये जाऊन तुला घट्ट मिठी मारायचा विचार करतोय पण केवळ विचारानेच काळजाचे ठोके तीव्र होत आहेत म्हणून स्वतःला आवरतोय. बघ, वेळेलाही तू इथे माझ्या शेजारी असण्याचा हेवा वाटतोय; आली तुझी बस तुला माझ्या पासून दूर घेऊन जाण्यासाठी. इथे मी तीळ-तीळ तुझ्याकडे सरकत होतो आणि ही एका झटक्यात तुला इथून घेऊन जाणार, दूर! असो, भेटत राहा मला अशीच स्वप्नात, विचारात आणि आठवणीत. कळत नाही हसू की रडू. मागील दहा मिनिटांत मी जगातले सगळे हेवे दावे, सुख दुःख, व्यवहार, छंद, आवडीनिवडी आणि स्वप्न सगळं काही विसरून तुझ्यात एकरूप झालोय तरी ना तुला ठाऊक ना या दुनियेला.

जा आता वेळ झाली तुझी जाण्याची. या बस मध्ये बसून बसस्टँडवरून तर निघून जाशील; पण इथून, माझ्या या मनातून कुठे जाशील. तुझ्यासोबत घालवलेला हा वेळ, विचारात का होईना, तुझ्या धरलेल्या हाताचा स्पर्श साठून ठेवलाय मी मनात, तुझी बट सावरण्याच्या बहाण्याने मोठा श्वास घेऊन भरून घेतलाय मी तुझा गधं माझ्या तनामनात. आता जा, आता ठरवूनही तू माझ्या पासून दूर जाऊ शकत नाही, आणि गंमत म्हणजे तुला ठाऊकही नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *