आयच्या गावातचला हसू येऊ द्या

हेल्थ कॉन्शियस बट नॉट सो हेल्दी!

NEW – AUDIO BLOG – NEW

“आठवड्यात एकदा बिअर पीत जा म्हणजे तब्येत सुधारेल!” किती प्रेम आहे ह्या ओळीत! (मी पीत नाही तो विषय वेगळा) नाही तर हे “पालेभाज्या खात जा, रोज सकाळी कडुलिंबाच्या काढा घ्यावा, भोपळा-कारल्या सारख्या भाज्या, व्यायाम, योगा, अमुक-तमुक”, असं बेचव ज्ञान दिवसातून हजारदा कानावर पडत असतं. नाही, माणसाने काळजी घ्यावी पण काही लोकांनी ‘काळजी’ ह्या शब्दाला जरा जास्तच मनावर घेतलंय आणि त्यामुळे हजारो-लाखो आजारांमध्ये आणखी एक आजार वाढलाय तो म्हणजे ‘हेल्थ कॉन्शीयसीझम’! आणि याचे काही रुग्ण कायम आपल्या निदर्शनात येत असतात….
सर्वात अगोदर येतात, ‘पाणीपुरी खाण्या आधी हाताला सॅनिटायझर लावणारे!’ अरे मित्रा, पाणीपुरी खाण्या आधी हात स्वच्छ करशील तर ती पाणीपुरी चविष्ट कशी लागणार! हात जर थोडे मळलेले, धुळीमातीने माखलेले असतील तरच पाणीपुरी खाण्यात खरी मजा! नशीब त्या पाणीपुरीवाल्याने तशी हेल्थ कॉन्शीयसवाली काळजी घेतलेली नसते नाहीतर पाणीपुरी आज डाऊन मार्केट असती, असो. पुढे येतात ‘रोज अंघोळ करणारे, अगदी हिवाळ्यातसुद्धा!’ मी काय म्हणतो कुत्री, मांजर, गाय, बैल रोज अंघोळ करतात का? नाही. तरी ते छान आणि सुदृढ वगैरे असतातच ना.. आणि मला असं वाटतं की ज्याने आपलं शरीर बनवलं त्याने ते रोजच्या रोज अंघोळ करण्यासाठी बनवलेलच नसणार! तसं असतं तर आपण बेडुक, मगर, कासव यांच्यासारखे तास-तासभर पाण्याखाली राहू शकलो असतो पण सुदैवाने ती पॉवर आपल्याकडे नाही. ज्या प्रमाणे वाघ, घोडा, गाढवं महिन्यातून एकदा किंवा दोनदा अंघोळ करतात त्याचप्रमाणे आपण केल्यास काहीच हरकत नाही; फार तर फार आठवड्यातून एकदा (इच्छा झाली आणि आठवण आली तरच!) आणि बॉडी डियो नावाचा प्रकार काय मच्छर मारण्यासाठी नव्हे!

(एक सिक्रेट) असं नाही की मला कधीच ‘गर्लफ्रेंड’ नव्हती (‘होती’ म्हणजे, आता नाही) पण तिलाही हा हेल्थ कॉन्शीयसीझम चा आजार होता. मुळात प्रॉब्लेम हा नव्हता की तिला हा आजार होता; प्रॉब्लेम हा होता की, साधी सर्दी झाली तरी ती डॉक्टर कडे जायची, माहित नाही हेल्दी राहण्यासाठी कसल्या कसल्या गोळ्या खात राहायची आणि तरीही कायम आजारी असायची. एक वेळ अशी आली की मला तिच्या मेडीसिन आणि त्या घेण्याच्या वेळा सुद्धा तोंडपाठ झाल्या होत्या. मलातर कळतच नव्हतं मी बॉयफ्रेंड आहे की एखाद्या दवाखान्याच्या कंपाऊंडर! एवढंच नाही तर ती डाएटच्या नावाखाली मला महागड्या ठिकाणी नेऊन ब्रेडमध्ये काकडी-टमाटे घालून खायची; एक घास बत्तीस वेळा चावायची (सोबत माझं डोकही); ‘हेल्थ टिप्स’ वगैरे चे ब्लॉग वाचायची आणि सगळ्यात अवघड म्हणजे सकाळी सहाला उठून योगा करायची! सहाला! मी तिला तिच्या ह्या आजारातून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी ती गेलीच; ब्रेकअप करून! कारण तिला हात धुवून प्रेम करणारा नाही तर हात धुवून जेवण करणारा बॉयफ्रेंड हवा होता! आणि मी या संधीचं सोनं केलं, आय मिन ब्रेकअप केलं! असो, येणाऱ्या प्रत्येकाला एक दिवस जायचंच असत तशी ती ही गेली; दुसऱ्याकडे! देव त्या दुसऱ्याचं भलं करो…
\

#D4mad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *