जनरल डबा

ही शाळा रोजचीच!

“इज्या दमला का लगा..?” गाडी यायला 5 मिनिटे वेळ होता, तेवढयात हरी विजू ला म्हणाला.
” हा रे लय पाय दुखत्याती.” विजू म्हणाला.
“इज्या इथंच थांब, महि बकिट इथंच हाय लक्ष ठीव. लै तहान लागलीया म्या पाणी पिऊन आलोच.” हरी म्हणाला.
“लवकर ई गाडी येणार हाय आता.” छोटा विजू मान हलवत म्हणाला.
“हा आलोच.” म्हणत हरी पळाला.

(विजय आणि हरी दोघे मित्र, शाळा सुटल्यावर बाकी वेळेत रेल्वे स्टेशनवर पाणी आणि चणे-फुटाणे विकून आपल्या गरीब कुटूंबाला हातभार लावायचे, त्यांची ही गोष्ट! गोष्ट कसली असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात रोजचेच!)
विजू शांत बाकावर बसून दुखणारे पाय स्वतःच्याच हाताने चेपत होता. रोजच्या प्रमाणे घरी जाण्याची वेळ झाली होती पण एव्हाना गाडी आली नव्हती.
दुसरी कडे हरी पाणी प्यायला आलेला. पाणी पिऊन निघतोच की तेवढयात कुणी तरी त्याचा हात घट्ट धरला. मागे वळून पाहतो तर टीसी! मोठे डोळे करुन त्याला पाहत म्हणाला,
“टिकिट दिखा बच्चे..” आणि त्याला ऑफिस मध्ये घेऊन गेला.
इकडे विजू हरीची वाट पाहत होता. गाडी चा आवाज यायला लागला होता तरी हरीचा काही पत्ता नव्हता. गाडी दिसायला लागली तरी हरी दिसेना त्यामुळे विजू थोडा घाबरला.
“छोड़ो साब मेरी गाड़ी आ गयी, पैर पड़ता हू साब!” हरी अगदी रडका चेहरा करुन त्यांना सोडायची विनंती करत होता.
“टिकिट कौन निकलेगा, तेरा बाप?” त्याला काही पाझर फुटेना.
“जाने दो साब गाड़ी निकल जायेगी.” हरी बोलला. त्याला काही सूचेनासं झालं.
इकडे विजूची नजर हरीला शोधत होती. गाडी अगदी समोर आली होती. आता मात्र विजू रडकोंडीला आला. काय करावे त्याला सूचत नव्हते.
तिकडे हरी रडत होता, विनंती करत म्हणत होता,
“जाने दो साब आई घर पे वाट पाह्यती है.”
हे ऐकून टीसी ला थोडी दया आली आणि त्याचा हात सोडत म्हणाला, “अगली बार ऐसा मत करना.”
“नहीं साब आगेसे नहीं.” हरी बोलला.
एवढं बोलून त्याने डोळे पुसत विजूकडे धाव घेतली. त्याला घरी जाण्यापेक्षा एकट्या विजू चे काय हाल असतील याची जास्त काळजी होती. रेल्वे हळूहळू निघाली होती…
विजूला हरी लांबून धावत येतांना दिसला तेव्हा कुठे त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तो हरीची रिकामी बकेट आणि त्याची चणेफुटाण्यांची माळ घेऊन चालत्या गाडीत समोरच्याच बोगी मध्ये चढला. गाडीचा वेग आणखी वाढला. हरीने ही विजुला पाहिलं होतं. तो त्याच्या कडे धावत येत होता. गाडीचा वेग थोडा वाढला. विजू बकेट आणि त्याचा सामान आत ठेऊन दरवाज्यात उभा राहून हरिला चल लवकर म्हणून खुणावत होता. हरी दरवाज्या पर्यंत आला. चालू गाडीत चढण्या उतरण्याची त्याची रोजचीच सवय. तो विजू समोर येऊन दरवाज्यातून गाडीत चढत होता की अचानक त्याचा पाय घसरला. आणि त्याचे हात पण निसटले. पण नशीब विजू दारात होता. हरी पडतोय हे पाहून त्याने लगेच हात समोर केला आणि हरीची चार बोटे त्याच्या हातात आली. गाडीचा वेग वाढला प्लॅटफॉर्म वरचे लोक फक्त पाहत होते. हरी चे पाय प्लॅटफॉर्म वर घासत होते. पायात तुटका फुटका बूट होता. “विजू सोडू नगस, वढ जोऱ्यात.” हरी ओरडत होता.
विजू ला काय करावं सुचत नव्हतं. त्याने दोन आरोळ्या लावल्या. “ओ… कोणी हाय का? ओ… मदत करा!”
पण डब्यात कोणी नव्हतं. विजू हरीचा हात सोडू शकत नव्हता कारण हात सोडला तर कदाचित हा प्लॅटफॉर्म आणि गाडी दोन्ही मधे घसरत गाडी खाली जायचा याची त्याला भीती होती. आणि प्लॅटफॉर्म संपे पर्यंत धरून ठेवलं तर त्याचे पाय घासून जातील म्हणून त्याने हरीचा हात घट्ट धरून ठेवला होता आणि जीवाच्या आकांताने आपली सगळी ताकद लावून हरीला आत ओढत होता.
प्लॅटफॉर्म वरचे लोक तमाशा पाहत होते, ओरडत होते, कुणी शुटिंग करत होतं, पाहणाऱ्यांना हरीचं जाड शरीर पाहून वाटलं “हा लुकडा काय याला ओढेल. याचं आता काही खरं नाही.” अशा गप्पा सुरु झाल्या होत्या.
हरी पायातील बूटावर घासत जात होता. विजूने जिव ओतून ताकद लावली. शेवटी डोळे बंद केले आणि अगदी निडर पणे सर्व भार देऊन त्याने हरीला ओढलं. हरी थोडा सावरला; त्याने लगेच दांडा धरून हवेत स्वतःला उचललं आणि आत उडी घेतली.
जसा हरी आत आला विजूचे डोळे भरून आले. हरीचा हात तसाच धरून तो रडत होता.
हरीचे दोन्ही बूट समोरच्या बाजूला फाटले होते. पायाची बोटे फाटलेल्या बुटातून स्पष्ट दिसत होती. फारशी जखम नव्हती झाली पण आणखी थोडा उशीर झाला असता तर मात्र बोटे साळली गेली असती. ही घटना अगदी जलद झाली होती. हरीचं घसरणं, विजूचं विचार करणं आणि सर्वस्व पणाला लावून त्याला वाचवणं हे फार तर फार एका मिनिटभरात झालंपण खुप काही अनुभवून गेलं !


या गोष्टीमुळे दोघे जरा घाबरले होते तेवढयात शेजारच्या टॉयलेट मधून एक जाड मोठ्या मिश्यावाला माणूस नाकातून धुर सोडत बाहेर आला आणि म्हणाला,
“काय झालं रे, काहून् ओरडायले?”
एव्हाना दोघे सावरले होते. त्यांनी त्या माणसाला झालेला सर्व प्रकार सांगितला.
ते ऐकून त्याला विश्वास नाही बसला.
“हाहाहा… या एवडूश्या कारट्याने तुला..? बरं…!! मीच भेटलो का सकाळ पासून.” असं म्हणत तो आत सिट वर जाऊन बसला.
हरी आणि विजू मात्र दारातच होते. त्या व्यक्तीची प्रतिक्रिया पाहून त्यांच्या लक्षात आलं की आपल्या गोष्टीवर कुणी विश्वास ठेवणार नाही, म्हणून ही गोष्ट गावात किंवा घरी पण कुणाला सांगायची नाही असं त्यांनी ठरवलं. तालुक्याचं स्टेशन आलं, दोघे घरी गेले. विजूने घरी जाऊन आईला मीठी मारली.
“काय झालं बाळ?” आईने विचारलं.
“काय नाय आई दमलोय.” विजू म्हणाला. त्याने कुणाला काही सांगितलं नाही.
दुसऱ्या दिवशी परत सकाळी ६ ला शाळेत जाण्यासाठी हरी वह्या, पुस्तकं थैलीत घालून विजू च्या घरी आला. विजू थैली घेऊन तयार होता. हरीने आवाज देण्या अगोदर विजू बाहेर आला. विजूने हरीचे ते बूट पाहिले आणि त्यांच्या कडे पाहून हसला. दोघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून हसत-हसत निघाले…
.
.

कधी, कोण कुणाला जगण्याची उम्मेद देईल सांगता येत नाही! ह्यांच्या पेक्षा नक्कीच मोठे नाहीत आपले प्रॉब्लेम्स! किमान आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी टाहो करून परिजनांना सांगता येतात, पण काही लोकांच्या आयुष्यात तीही सोय` नसते. त्याच्या तुलनेत आपण नशिबावनच!

D4MAD

3 comments
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *