आयच्या गावातचला हसू येऊ द्या

प्रायव्हसीच्या फाट्यावर …

आजकाल प्रायव्हसी नावाचा प्रकार मुळात अस्तित्त्वातच राहिला नाहीये. मोबाइलला लाख पासवर्ड, पॅटर्न लॉक्स, पिन्स किंवा फिगरप्रिंट लॉक्स ठेवा तुमचे शुभचिंतक अगदी सफाईने तुमच्या प्रायव्हसीच्या फाट्यावर मारतील! नुकताच भाडीपाचा एक कौटुंबिक विडियो पाहिला आणि लक्षात आलं, आमची (बिचारे बॅचलर) प्रायव्हसी हि सार्वजनिक प्रायव्हसी म्हणून वापरली जाते स्पेशली बॅचलर मुलांच्या आयुष्यात अगणितपणे!
ह्याची सुरूवात करायची झाल्यास नक्कीच हॉस्टेलच्या वार्डन पासून करावी लागेल. काही दिवसांपूर्वी सकाळी-सकाळी अंघोळ करून रूममध्ये कपडे घालत होतो तेवढ्यात अचानक डोअर नॉक न करता डुप्लिकेट चावीने दार उघडून आमची ५५+ असलेली वार्डन समोर प्रकट झाली. मी बिचारा अर्धवट कपड्यात गोंधळून गेलो. आपली अब्रू कशी झाकू काही कळत नव्हतं, रूममध्ये चार भिंती आणि दरवाज्यात वार्डन शिवाय काहीच दिसत नव्हतं. लपावं तरी कुठे आणि कसं ? अंग थंड पडलंय, मेंदूत मुंग्या आल्यात, तोंडातुन शब्द फुटत नाहीये, बुद्धी बधिर झालीये, सगळं अंग लाजाळूच्या झाडा सारखं आखडून गेलंय, जिवाच्या आकांताने अंग कसं झाकायचं याचा विचार करतोय, साला ‘अभी के अभी ये धरती फट जाय और मैं उसके अंदर समा जाऊ’ असं काहीसं फील करतोय आणि तरीही ह्या वार्डनला काही एक फरक पडत नाहीये! ती सपशेल मला आणि माझ्या भावनांना इग्नोर करून अगदी नॉर्मल आवाजात म्हणाली “किती कचरा करता रे रूम मध्ये आणि मूर्खा दिवसा लाईट चालू का लागतो तुला?” मला अजूनही हाच प्रश्न होता कि करावं तर काय करावं? तेव्हढ्यात समोर एक टीशर्ट दिसला, घातल्या नंतर कळलं की त्याचा मागचा भाग पुढे आणि पुढचा भाग मागे गेलाय! हुश्शह्ह्ह! असो, तात्पुरती इज्जत तर झाकली! पण ह्या बाई मात्र काही घडलंच नाही असं दाखवत लाइट बंद करून निघून गेल्या…
त्यानंतर येतात आमच्या शेजारच्या बिल्डिंग मधल्या मोरे काकू! खर तर प्रत्येक बॅचलर मुला-मुलींच्या आयुष्यात एक ‘मोरे काकू’ असतातच ज्या कायम तुमच्या बारीक सारिक गोष्टींवर लक्ष ठेऊन असतात; म्हणजे तुम्ही कसे वागता, तुम्हाला दिवसभरात किती मूलं-मुली भेटायला येतात (भेटायला येणार्या प्रत्येकाबरोबर तुमचे ‘झंगाट’ आहे अशी त्यांची बहुधा मान्यता), तुम्ही किती वेळ आणि कुणाशी फोनवर बोलता वगैरे वगैरे… ह्या मोरे काकू नावाच्या प्राण्याचे मिस्टर सकाळी ऑफिसला जातात, मग दिवसभराची काम आवरून ह्या आपल्यावर लक्ष ठेवण्याचं काम करतात आणि त्यातून वेळ मिळालाच तर पार्ट टाइम गॉसीप गॉसीप खेळतात! (ह्या गॉसीपच्या विषयांवर वेगळा गॉसीप करायला नको) मला तर कधी कधी शंकाच येते की यांना नक्की माझ्या आईने माझ्यावर लक्ष ठेवण्याठी माझ्या मागावर पाठवलंय. कारण अचानक एखाद दिवशी ह्या मोरे काकू मला पोहे खायला बोलावतात, मी पोहे खात असतो आणि त्या माझं डोकं! “काल संध्याकाळी साडेपाच वाजता सिटी मॉल मध्ये तुझ्या सोबत ती मुलगी कोण होती? तीचं नाव काय? ती काय करते? ती तुझी कोण ? फक्त मैत्रीण की अजून काही?” आणि ह्या मोरे काकूंना तुम्ही कितीही डोकं फोडून सांगा ह्या तुमचं @#** काहीही ऐकणार नाही उलट “तू मला आगदी निसंकोचपणे सांगू शकतो, मी कुणाला काहीही सांगणार नाही. हवं तर तुझी मैत्रीण म्हणून सांग बाबा!” असे विळखे देऊन अडकंवायचा प्रयत्न करणार आणि शेवटी जेव्हा त्यांना कळतं की ‘आता काहीही एक साध्य होत नाहीये’ तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून “तुझ्या आईचा नंबर देतोस का? खूप दिवसांपासून त्यांच्याशी बोलायची इच्छा आहे” असं म्हणतील. तुम्हाला असेल हो काकू मोठी इच्छा पण मला स्वताला घोडे लावून घेण्याची मुळीच इच्छा नाही (मनातल्या मनात), “एसएमएस करतो” असं बोलून मी निमूटपणे पोहे संपवून काढता पाय घेतो… संकट कितीही मोठं असलं तरी पोहे संपवनं देखील महत्वाच असतं. खायच्या बाबतीत नो एक्क्ष्क्युजेस! असो, का हवी असते ही माहिती ह्यांना कुणास ठाऊक.पण ह्या असल्या मोरे काकूंमुळे आम्हा बॅचलर मुलांचं आनंदी जीवन धोक्यात आलंय. कुठे जायची सोय नाही कि कुणाला भेटायची हिंमत होत नाही… आज काल स्वप्नात जरी मुलगी दिसली तरी मोरे काकूंचा आवाज कानावर येतो “कोण आहे हि मुलगी?”

त्यानंतर येतात कॉलनीतले चिल्लेपिल्ले! ‘मुलं म्हणजे देवा घरची फुलं किंवा लहान मुलं शांत, निरागस, निस्वार्थ असतात’ हा निव्वळ गैरसमज आहे, असं काहीही नसतं. ह्यांच्या आईबाबांना ह्यांचा त्रास एवढा अनावर होतो कि ते ह्या अवली कारट्यांना माझ्या सारख्या निरागस लेकरावर खुल्या सांडाप्रमाणे सोडून देतात! ह्या बेण्यांचं टार्गेट असतो तुमचा फोन, आणि तो जर तुम्ही दिला नाही तर हे बहाद्दर घरी जाऊन चुगल्या करतात “दादाच्या रूम मध्ये बियर ची बाटली आहे” पण हे नाही सांगणार कि ‘तो बियर नावाचा शॅंपू आहे ‘… अश्या खोट्या अफवा पसरवून ‘शेजारच्या हॉस्टेल मधली मुलं किती वाईट आहेत’ हे दाखवायचा प्रयत्न ही मुलं रूपी राक्षस करतात, ह्यांनीच खरं तर आम्हाला बदनाम केलंय, अन्यथा आम्ही खूप सभ्य आहोत! (असं मला वाटतं) जर यदाकदाचित तुम्ही तुमचा फोन ह्यांना दिला तर हे काट्टे ‘गेमच्या नावाखाली आपल्याशी गेम करतात’.. गेम फक्त नावाला असतो, एकदा फोन हातात मिळाला कि गपचूप कोपऱ्यात बसून ‘व्हाट्स अँप वरची चॅट वाचणे, गॅलरीतले फोटो पाहणे आणि संधी मिळालीच तर तुमच्या फोन मध्ये कुठल्या-कुठल्या दर्जाचे विडिओ असतात ते पाहणे’ हा ह्यांचा मुख्य छंद! बरं ह्यांना रागावूही शकत नाही, एकदा रागावलं तर हि ‘दादा-दादा’ म्हणणारी पोर ‘काका’ म्हणायला सुरूवात करतात म्हणून न रागावलेलच बरं! एकंदरीत लहान लहान काट्टे सुद्धा आमची प्रायव्हसी पायाखाली तुडवतात…
ह्या सह आणि ह्या व्यतिरिक्त असे अनेक प्राणी आहेत ज्यांना आमच्या प्रायव्हसीच्या फाट्यावर मारायला आवडतं. पण सांगायचा हेतू एवढाच कि, बिचार्या सुखी बॅचलर मुलांची जमात दिवसेंदिवस विलुप्त होत चालली आहे. त्यांच्या प्रायव्हसीच्या फाट्यावर मारणं बंद करा, जगा आणि जगू द्या!

10 comments
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *