आयच्या गावातजनरल डबा

पुन्हा अंधार झाला …

सकाळी रोजच्या प्रमाणे तिने खिडकीचा पडदा सरकवला आणि सूर्याची किरणं थेट डोळ्यावर आली आणि साखर झोपेचं खोबरं झाल, हात-पाय ताणून आळस देत जोरात सुर लावला, “गुड मॉर्निंग मम्” आणि ती डोक्यावर हात फिरवून “उठ आता” असं म्हणून निघून गेली. परत डोळे घट्ट बंद करणार तितक्यात i-च्या फोन ची बेल वाजली (आय-च्या म्हणजे स्टीव्हच प्रोडक्शन). मूड नसताना फोन घेतला अन आवाज ऐकुन लक्षात आल काल ‘हिला’ मूवी ला नेण्याच प्रॉमिस केलं होतं. खाड दिशी उठून बोललो, “हो-हो आलोच”…. आणि डायरेक्ट फ्रेश व्हायला निघालो. दहा वाजले तरी मंद गोड थंडी जाणवत होती. लवकर-लवकर शॉवर घेतलं आणि तयारी सुरु केली… मी एका श्रीमंत घरातील एकुलता एक कुलदीपक ‘सुरज’! घरात कुठल्याच गोष्टीची कमी नाही; आईबाबांनी सर्व हट्ट पुरवले; पण का? कुणास ठाऊक मला माझा भूतकाळ फारसा आठवत नाही. असो आज मी माझ्या पहिल्या-वहिल्या गर्लफ्रेंड पिक्चरला घेऊन जातोय. इंप्रेशन कमी पडायला नको म्हणून मस्त लेदरचं जॅकेट, रोलेक्सचं घड्याळ, शूज आणि गॉगल लावून राजबिंडा झालो. (वेगळा मेकप करायची काही गरज नाही; मी आहेच जन्मतः हॅंडसम!!)
बेडरूम बाहेर येताच बाबांचं दर्शन झालं. त्यांना ” गुड मॉर्निंग” म्हणून मॉडर्न दंडवत केला. आणि परत एकदा i-चा फोन केकाळायला लागला. पटकन खिशातून बाहेर काढून, “येस डियर ऑन द वे आहे, आलोच.” म्हणून कट केला, समोर मातोश्री ब्रेकफास्ट घेऊन उभ्या होत्या. तोंड वाकडं करून ब्रेड चे दोन घास तोडले आणि आई च्या गालावर पापा देऊन निघालो (रोजच्या प्रमाणे). चार चाकीची चावी घेऊन, “बाय आई संध्याकाळ पर्यंत येतो, फ्रेंड्स कडे जातोय स्टडी साठी” (शुऽऽऽऽक आईला अजून माहित नाही मी कुठे जातोय). आई बिचारी दरवाज्यात येऊन ओरडली, “बाळा लवकर ये, काळजी घे आणि काही तरी खाऊन घे” म्हणत ‘बाय’ करत हात हलवला… गाडी स्वच्छ पुसुन तयार होती पण आत मात्र सगळा पसारा दिसत होता, कॉलेज ची बॅग चॉकलेटचे रॅपर, फट दिशी सर्व आवरून जॅकेट चा गॉगल काढून डोळ्याला लावला आणि चावी लावून फिरवली आणि, अचानक जोरात रेल्वे च्या इंजिन चा आवाज आला, अनाउन्समेंट्स होत होत्या, प्रवाश्यांची वर्दळ सुरु होती; सगळा गोंगाट ऐकायला येत होता…आणि मला हडबडून जाग आली…
दिवस उजाडला होता, सूर्याची मंद ऊब जाणवत होती; प्लॅटफॉर्म मात्र थंड पडला होता. जाग आली होती पण अंधार मात्र कायम होता, का नसावा? तोच तर एक खरा सोबती होता जन्माला आल्या पासून! तोच तर एक अंधार होता ज्याने कधी एकटं नाही सोडलं आणि असाच मरे पर्यंत सोबत राहणार होता. मी फक्त नावाचा ‘सूरज’, बाकी नशिबात असो अथवा आयुष्यात; फक्त आणि फक्त काळोख! ‘या न्हाव्याच्या दुकानात बसून ऐकलेल्या सिनेमाच्या कथे मुळे कसली विनोदी स्वप्न पडतात’, असा विचार करत गालावर स्मित हास्य आणून फाटकी वाकळ सावरून पिशवीत कोंबली. शेजारी पडलेली काठी एका हाताने उचलली; सामानाची पिशवी दुसऱ्या हाताने पाठीवर ठेऊन स्टेशनचं ‘सार्वजनिक शौचालय’ गाठलं. तिथे आंघोळ करून तिथेच आपलं गाठोडं ठेऊन स्वारी निघाली कामाला…
सुरज आंधळा असला तरी त्याच्या पायांना प्रत्येक रस्ता आणि या स्टेशनचा अगदी काना-कोपरा माहिती होता, हातांना प्रत्येक नोटांची आणि नाण्याची जाण होती त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक ट्रेनचं नाव आणि वेळ तोंडी पाठ होतं. अनाथ व अंध आश्रम सोडल्या पासून गेली दहा वर्षे तो हेच तर करत होता. फाटके पण स्वच्छ कपडे, बुटांमधून पायाचे अंगठे स्पष्ट दिसत होते, मोजे तर नव्हतेच! मी आंधळा आहे असं ओरडून सांगणारा काळा चष्मा, एका हातात अंधछडी, दुसऱ्या हातात तीन-चार पुस्तकं आणि गळ्यात अडकवून कमरे वर लटकवलेली पुस्तकांनी भरलेली बॅग. बॅग कसली? थैलीच होती ती..! झोळी म्हणा हवं तर…


रोज आपलं हे सगळं सामान घेऊन रेल्वे-रेल्वे मधून पुस्तक विकायची ही सुरजची ठरलेली दिनचर्या. पुस्तक’च’ विकायची कारण कि त्याला पुस्तकाची भारी आवड. कधी पाहिली किंवा वाचली नव्हती पण ती वाचून आयुष्य घडतं असं त्याने ऐकलं होतं म्हणून जणू त्याने वसाच घेतला होता. त्याचं ठरलेलं होतं, किंमत दिसत नाही म्हणून एकाच किमतीची पुस्तकं विकायला घ्यायची, मात्र ‘विकायची तर पुस्तकाचं’!! मिळणाऱ्या मिळकती वर 2 वेळ जेवण करायचं परत थोड्या पैशांची पुस्तकं विकत घ्यायची आणि बाकी उरलेली सर्व पुंजी एका डब्यात जमा करायची. आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो डबा त्याच आंनाथ आणि अंध मुलांच्या आश्रमात द्यायचा ज्या आश्रमात त्याला सांभाळलं होतं… फार काही आपेक्षा नव्हत्या त्याच्या बस आयुष्यात भीक मागायची नाही हे ठरलेलं होतं; बस..! स्टेशन वर लोक चेष्टा करायचे, टिंगल उडवायचे, गाडीत लोक शिव्या घालायचे तर कधी चुकून कमी-जास्त धक्का लागला तर हात देखील उचलायचे; पण त्याच्या वाटेला आलेल्या दारिद्रया समोर ह्या सर्व गोष्टी त्याला छोट्या वाटायच्या! दिवस भर काम करून रात्री परत आपली खूप सारी स्वप्न घेऊन अंधाराने दाटलेल्या डोळ्याच्या पापण्या बंद करून स्वतःला आणखीन अंधारात ढकलून द्यायचा. आणि विचार करायचा,

‘माझं देखील कुटुंब असतं तर?’ ‘कुणी प्रमाणे हाक द्यावी’; ‘माझी पण कुणी रोज संध्याकाळी वाट पाहावी’; ठीक आहे हे सर्व नाही तर किमान ‘हे जग मला निधड्या डोळ्याने अनुभवताआलं असत तर? बघता आलं असतं तर? बघता आलं असतं तर? बघता आलं असतं तर?’… असा विचात करत उद्याच्या प्रवासासाठी नव्या स्वप्नां मध्ये हरवून जायचा…

-D4mad

11 comments
  1. Sandip patil

    दिवसेंदिवस तुझ्यातली ही लेखणी वाढत चाललीये भावा …..
    भारी लिहिले
    लब्यु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *