आयच्या गावातचला हसू येऊ द्या

तिच्यातली “ती”…

कॉलेज मधून घरी येऊन तिने गाडीची चावी टीपॉय वर ठेवली. घाई-घाईने पाठीवरची बॅग सोफ्यावर फेकली. सकाळ पासून काही खाल्लं नव्हतं म्हणून खुप भूक लागली होती. फ्रेश न होता ‘आई’ असा आवाज देत किचन कडे पळाली. किचन मध्ये जाणार इतक्यात बाबा किचन मधून बाहेर आले. त्यांनी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले, “बाळा पुण्याच्या मुलाचा होकार आलाय ह्या वर्षी परीक्षा झाली की तू ठरव काय करायच ते.” हे ऐकून तिच्या चेहर्या वरचे भावच बदलले. कांदेपोह्याचे कार्यक्रम, साडी, स्वयंपाक ह्या गोष्टी आता तिला कदाचित नकोशा वाटत होत्या . तिचा चेहरा उतरला. मागून आई हळु आवाजात म्हणाली “तुला इच्छा असेल तर, आम्ही तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहोत” तिने फक्त आई कडे एक कटाक्ष देऊन पाहिलं आणि परत नजर शांतपणे खाली झुकवली. गोल्या समोरून टीव्हीचं रिमोट बाजूला ठेवत म्हणाला “तायडे ह्या वेळेस नकार नको देऊ मुलगा मस्त आहे शिवाय पुण्यातला जिथे तु या आधी राहिलेली आहे म्हणजे तुला सेटल व्हायला त्रास नाही होणार.” बाबांनी गोल्या कडे रागाने पाहिलं आणि म्हणाले “तिचे निर्णय तिला घेऊ देत गोल्या.” आता मात्र तिला तिथे उभा राहण शक्य नव्हतं. ती तशीच मान खाली घालून बेडरूमकडे निघाली. आई म्हणाली, “बाळा जेवण करून जा, निर्णय शांतपणे विचार करून कळव.” पण ती काहीही न ऐकल्या प्रमाणे शांत निघून गेली.

बेडरूम मध्ये येऊन तिने दार आतून घट्ट बंद केलं. खिडक्या बंद करून पडदे ओढून घेतले. सगळीकडे शांतपणे एक नजर फिरवली. आता आपल्याला कुणी पाहणार नाही याची खात्री होताच, तिचे चेहऱ्यावरचे भाव आणखीनच बदलले. तिने जोरात बेड वर उडी मारली, गळ्यातली ओढणी जोरात हवेत उडवली, तोंडावर आनंदी-आनंद, उभा राहून लांब हात पसरून दोन घिरक्या घेतल्या, केस मोकळे सोडुन, बेड वरून खाली उडी मारली, भिंतीवर लटकवलेलं गोल्याचं गिटार गळ्यात अडकवून आवाज न होता वाजवण्याचं नाटक करत होती आणि रॉकस्टार प्रमाने मोकळे केस जोर-जोरात फिरवत होती, गिटारला गळ्यातून काढून धोनीच्या बॅट सारखं धरून फिरवू लागली तेवढ्यात तिची नजर समोर शांतपणे बसलेल्या टेडीबीयरवर गेली. हातातली गिटार गादीवर फेकत तिने तो मोठ्ठा टेडी अलगद कुशीत उचलून त्याला घट्ट मिठी मारली, त्याचा गालावर किस करत तिने त्याच्या बरोबर डान्स (सालसा) करायला सुरुवात केली. मग थकून तिने टेडी समोर धरला आणि त्याला चिमटे घ्यायला लागली, 2-3 काना खाली मारल्या, त्याचे केस ओढू लागली, शेवटी त्याचा पाय धरून गोल-गोल फिरवत तिने तो टेडी भिंतीवर फेकून मारला. नाचायच्या भरात 3-4 वेळा पडली सुद्धा. पण आनंदाच्या भरात तिला काहीच कळत नव्हतं. मनातला आनंद कसा व्यक्त करावा तिला कळतच नव्हत. दोन्ही हात लांब पसरून तिने स्वतःचं अंग गादीवर अलगद सोडून दिलं आणि डोळे घट्ट बंद केले. त्या मुलाला ती पुण्यात कॉलेज मध्ये असल्या पासून ओळखत होती (क्रश) आणि पुण्याला नेहमी साठी जाण्याचं तीच स्वप्न होतं. दोन मिनिटं डोळे बंद करून गालावर मंद हास्य खुलवत. दोन्ही हाताने चेहरा झाकून लाजू लागली. शेवटी एक मोठ्ठा श्वास टाकून डोळे उघडून उठली. केस बांधून रूम अगोदर प्रमाणे व्यवस्थित करून ठेवली. आणि आता पर्यंत काहीच झालं नाही असा आव आणून हळूच मान खाली घालून बेडरूमच्या बाहेर आली.

आई आणि बाबा परत किचन मध्ये काहीतरी कुज-बुज करत होते. हॉल मध्ये गोल्या चिप्स खात-खात तेच बोरिंग “WWF” (Wrestlemania) पाहत रेड्या सारखा सोफ्यावर बसला होता. ती हळूच चोरपावलाने येऊन त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याच्या पाठीत एक बुक्का मारून त्याच्या हातातलं रिमोट हिसकावून घेतलं आणि तीच फेव्हरेट कार्टून लावलं. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोल्या थोडा भांबावून गेला आणि तिला चिडवत म्हणाला “ झिपरे ‘हो’ म्हण आणि जा निघून त्या पुण्याला.” तीने गोल्याचं तोंड घट्ट दाबलं आणि म्हणाली “माकडा गप्प बस आई बाबाला आत आवाज जाईल, डुक्कर छाप मी जाईल नाहीतर इथेच राहील जास्त टीव-टीव करू नको. आणि हो म्हश्या तो मुलगा माझा कॉलेजचा क्रश आहे सो मी “होच” म्हणणार आहे. पण माझ्या पद्धतीने! जर का तू मध्येच कुठे पचकला ना, तर तुझं सिगरेट चे सिक्रेट बाबापर्यंत जाईल. म्हणून नीट व प्रेमाने सांगते गप्प राहायचं नाहीतर मार खाशील” असं म्हणत तिने त्याच्या तोंडावरचा हात काढला. गोल्या फक्त डोळे फाडून पाहत होता. तिने ऐटीत समोर ठेवलेल्या बॉटल मधून थंड पाणी पिलं. गोल्या कडे पाहून एक दुष्मन वाली smile दिली आणि त्याच्या मांडी वरची चिप्स ची प्लेट हिसकावून घेतली. गोल्याने बिचार्याने एका शब्दाने सुद्धा विरोध केला नाही. का करेल? बिचारा ब्लॅकमेल होत होता.

तिने सर्व चिप्स संपवून रिकामी प्लेट टीपॉय वर सरकवली पाणी पिऊन बसलीच होती तेवढ्यात किचन मधून आई बाबा बाहेर आले. त्यांना येताना पाहून परत तिने चेहरा उदास केला (नाटकी). बाबा समोर येऊन बसले आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले “बाळा काही घाई नाही परीक्षा संपल्यावर विचार कर. तुला पटलं तर ठीक आणि नको असेल तर नकार कळवू.” ती शांत पणे सर्व ऐकत होती. आई समोरच उभी होती. आई कडे एक नजर पाहून तिने बाबा च्या मांडीवर हळुच डोकं ठेवलं आणि म्हणाली “बाबा बस आता तुम्ही किती त्रास करून घेता. माझं शेवटचं वर्ष आहे. मला तुमच्या पासून लांब नाही जायचं, पुणे फार काही दूर नाही. मी तुमची अशी धावपळ नाही पाहू शकत. मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. परीक्षा झाल्या की मी तुम्ही म्हणाल तसं करायला तयार आहे.” असं रडक्या आवाजात म्हणत तिने बाबाला मिठी मारली. शेजारी बसलेला गोल्या तीच सगळं ढोंग पाहत होता. त्याला झिपरीचं नाटक पाहून जोरात हसायला येत होतं. पण बिचारा काहीच करू शकत नव्हता. बाबा तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, “ठीक आहे बेटा तुझी परीक्षा झाल्यावर बाकी बोलणी करूयात तोपर्यत तुम्ही एकमेकांना नीट भेटा, बोला, ओळखा, मैत्री करा.” बाबांच्या बोलण्याला तिने फक्त थोडीशी होकारार्थी मान हलवली. बाबा विषयाची सावरा-सावर करून बाहेर निघून गेले. मुलीने होकार दिला याचा त्यांना खुप आनंद होता. आई तिला म्हणाली “बाळा दोन घास खाऊन घे.” तिने नकारार्थी मान हलवून, “भूक नाही आई नंतर खाईल” असं उत्तर दिलं. आईला जरा काळजी वाटली ती तिच्या शेजारी जाऊन बसली आणि म्हणाली “बाळा तुला नसेल इच्छा यंद्दा तर तसं सांग आपण ह्या वर्षी रद्द करू. पण तु अशी उपाशी नको राहू.” ती उदास आवाजात म्हणाली, “नाही आई मी ठीक आहे, तू नको काळजी करू. मी जेवेल नंतर. पुणे बेस्ट आहे. आता झालं की शिक्षण वगैरे आता लग्न करून सेट होणार पुण्यात.” तिच्या डोक्या वरून हात फिरवत आई शांतपणे किचन मध्ये काम आवरायला निघून गेली.

गोल्या तिचे नाटक “आ” वासून पाहत होता. आई आत गेलेली पाहून गोल्याने तिला हात जोडले. राक्षसा सारखी जोरात हसून तिने गोल्याच्या पाठीत “आयुष्यमान भव” असं म्हणत एक जोराचा धपाटा टाकला. जोरात उडी मारुन “yessssssss… Mission successful म्हश्या” असं म्हणत बेडरूम मध्ये निघून गेली. अन बिचारा गोल्या पाठ चोळत बसला…

(आस होतं बरका बऱ्याचदा, तुम्हीतर नाही केलंत न.? खरं सांगा?)

-D4mad

7 comments
  1. के.चिरंजीवी

    अप्रतिम रे परत परत वाचावी अशी स्टोरी आहे अन मी कित्येक वेळेस वाचलीय पण…..असच लिहीत रहा रे

  2. Dipak jadhav

    This is slightely amazing and new intresting story i ever read. Really hope i can read more in next posts. So good and kindly write such more n more stories.
    Thanks for such good web site.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *