आयच्या गावातजनरल डबा

कॅफे, कॉफी आणि ती…

नेहमी प्रमाणे कॅफेच्या बाहेरच्या टेबलावर सगळे मित्र मिळून छान टवाळक्या करत बसले होते. बिल चुकवण्यासाठी एक-एकजण हळू-हळू काहीतरी कारण सांगून निघत होता. शेवटी विजू आणि अमोल दोघेच शिल्लक राहिले. ह्यांच्या छान गप्पा रंगल्या होत्या. एवढ्यात समोरून एक सुंदर मुलगी एका व्हाईट गाडीतून उतरताना दिसली. मोकळे केस, डोळ्यावर काळा गॉगल, मरून कलरचा वनपीस ड्रेस, पेन्सिल हिल, एका हातात पर्स, दुसऱ्या हातात आयफोन… एकंदरीत तिला पाहता ‘परफेक्ट’ म्हणजे हेच का? असा प्रश्न पडावा इतकी सुंदर. मनातल्या-मनात बॅकग्राऊंडला ‘तारीफ करू क्या उसकी’ वगैरे सारखे गाणे वाजत होते. ती कॅफे शेजारच्या केक शॉप मध्ये गेली. शेजारून गेली तेव्हा तिच्या सह एक मंद झुळूक येऊन इंपोर्टेड ‘स्वीट perfume’ चा सेंट सगळ्या वातावरणात दरवळू लागला. ती त्या शॉप मध्ये जाऊन एक पार्सल घेऊन परत गाडीत बसून निघून गेली. अमोल तर फक्त आ वासुन तिकडेच पाहत होता. एवढंच नाही तर आजू-बाजूला बसलेल्या तरुण मंडळी पासून तर सिनियर सिटीझन पर्यंत सगळे तिची गाडी लांब नजरेआड जाई पर्यंत तिकडेच पाहत होते. वन पीस पाहून असं होणं साहाजिकच होत.

ती दूर निघून गेली पण इकडे चर्चा पेटली, “वाह..! दिल गार्डन गार्डन हो गया”… “मस्त होती राव”… “कडक ना?”… “आई शपथ टवका”… “कुणासाठी केक घेतला असेल तिने?”… “तुला काय करायचं बे तू माल बघ”… “बडे बाप की बेटी होगी भाई”… “काय आज कालच्या त्या मुली शी शि शी..”…. “कुठे तरी पाहिलं राव हिला?” “काय ते कपडे कसा तो अवतार”…”स्टाईल मस्त होती”… असे आवाज कानावर येत होते.

संधी साधून विजू अमोलला म्हणाला, “कसली भारी गाडी होती ना तिची; ह्युंदाई….”

विजूचं बोलणं अर्ध्यात थांबवत अमोल म्हणाला, “गप रे गाडी काय पाहतो, तुला गाड्या शिवाय काहीच दिसत नाही; कसली भारी होती ती आईटम!”

विजू नॉर्मली म्हटला, “भारी होती, मस्त छान मेंटेन केलय तिने स्वतःला..”

(आता पुढे काय झालं हे सांगण्या आधी विजू आणि अमोल विषयी सांगतो. विजू अमोल पेक्षा लहान, जॉब साठी शहरात आलेला एक बॅचलर साधारण मुलगा, जो अमोलच्या घरी रेंट ने राहतो; म्हणून त्यांची ओळख. अमोल एक हुशार मुलगा. एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. त्याचं अजून लग्न नाही झालं. एक बहीण, भाऊ, वहिनी, आई ,बाबा आणि तो अशी छान जॉईंट फॅमिली आहे. घरी अमोल एक आदर्श मुलगा आहे आणि ऑफिस मध्ये बेस्ट एम्प्लॉयी. अमोल एवढा शिकलेला सुसंस्कृत मुलगा असून सुद्धा…….)

अमोल केसात हात फिरवत म्हणाला “अशी गर्लफ्रेंड नाही मिळत राव मला.”

विजू मंद हसून, “मिळेल रे मिळेल, ट्राय कर’

अमोल चेहऱ्यावरचे भाव राकट करत म्हणाला, “ड्रेस पाहिला का तिचा?”

विजू मान हलवत म्हणाला, “हं… मस्त होता वन पीस.. त्यामुळे अजून छान दिसत होती ती.”

अमोल हळू आवाजात बोलला, “आयला खूप नशीबवान असेल हिचा बॉयफ्रेंड. त्याला एवढी भारी वन पीस गर्लफ्रेंड! डिस्को, दारू, सगळे बिल हीच भरत असेल..!”

विजू खळखळून हसत बोलला, ” हो.. असेल कदाचित किंवा ती सिंगल असू शकते. ”

अमोल हसून, “नाही बे, अश्या मुली कधीच सिंगल नसतात.”

विजू थोडा गंभीर होऊन, “का नसेल?… तिची life, तिचे decisions…”

अमोलला विजूचं म्हणणं पटलं. तो विषय टाळत म्हणाला, “ते सोड पण तुला एक सांगू, अशा मुली गर्लफ्रेंड आहे तोपर्यंत ठीक आहे, पण लग्ना नंतर नाही.”

विजूला हे खटकलं. तो ओरडूनच म्हणाला, “म्हणजे..?”

अमोल तेवढ्याच उत्स्फूर्ततेनं म्हणाला, “म्हणजे लग्ना नंतर बायको कशी 24/7 घरमे होणा, शांत, संस्कारी, असे अर्धे कपडे घालून प्रदर्शन केलं तर काय इज्जत राहील भाई आपली.”

विजू आता न राहवून बोलला, “वा रे! तुला गर्लफ्रेंड मॉर्डन चालते; पण बायको सभ्य हवी? तुला गर्लफ्रेंड वोडका घेणारी पाहिजे आणि बायको जेवायला रात्री तुझी वाट पाहणारी? गर्लफ्रेंड वन पीस आणि बायको साडी? गर्लफ्रेंड मनमिळाऊ, बोलकी आणि बायको शांत संस्कारी? गर्लफ्रेंड ने जॉब करून तुझी बिलं भरली तर चालतंय बायकोने फक्त स्वयंपाक करायचा..?”

परत मध्येच विजूचं बोलणं थांबवून अमोल म्हणाला, “अरे लग्ना आधी ठिक आहे, नंतर आई बाबांनी कमवलेली इज्जत जपावी लागते आणि घरची सून म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते घरची.”

आजूबाजूला बसलेले सर्व लोक विजू कडे पाहत होते पण त्यांना न जुमानता विजू अमोलला म्हणाला, “हो का..! जर माहीत आहे स्वतःची तेवढी ऐपत नाही किंवा घरी चालणार नाही तर मग गर्लफ्रेंड पण तशीच बघ, तुला ऍडजस्ट करून घेणारी किंवा तुला भविष्यात जशी बायको हवी तशी.”

लोक तोंडाकडे पाहत आहेत हे पाहून अमोल शांत पणे म्हणाला “तु सिरीयस का होतोय विजू?”

विजू थंड आवाजात, “कारण तू चुकीचं बोलतोय अमल्या.”

अमोल विषयांतर करायच्या हेतूने म्हणाला, “जाउदे, कोण कुठली मुलगी ती, तिच्या मुळे आपण का भांडतोय, तुझी कोणी लागते का?”

विजू चिडला; अमोल कडे तीक्ष्ण डोळे करून हळू आवाजात तो म्हणाला, “खरं तर ह्याच प्रश्नाला खरा घोडा लागतो, तरी तुला एक सांगू ती माझी कोणीच नाही पण जसं तुझ्या बहिणीला वाटत असेल की ती स्वतःच्या घरी जशी फ्रीली राहते तशीच फ्रीडम तिला सासरी मिळावी; तसंच या जगातल्या प्रत्येक मुलीला हेच वाटतं. मी माझं मत मांडतोय, भांडत नाहीये. आमल्या काळ बदललाय; जसं तुला बंधन नको वाटतं तसंच त्यांनाही नको वाटतं. ह्यात चूक काय?”

अमोलला बहिणी विशयी बोललेलं नाही आवडलं तो म्हणाला, “माझ्या बहिणीचा काही संबंध नाही इथे.”

विजू थोडासा हसरा चेहरा करून, “हो बरोबर आहे; आता इथून गेली ती एलियन होती आणि तुझी बहीण तर मुलगी.. हो ना?

अमोल भयंकर चिडून म्हणाला, “तिचे कपडे पाहिलेस विज्या. माझी बहिण तशी मिरवत नाही अर्धवट कपडे घालून. कळलं? आमच्या घरचे संस्कार तसे नाहीत.”

विजू टेबलावरचा ग्लास उचलून दोन घोट पाणी पिऊन म्हणाला, “बाळा ते वातावरणावर डिपेंड असतं. आपण ज्या प्रकारे वाढलो त्यावर हे डिपेंड करतं की आपण कसे वागतो किंवा राहतो. तुमच्या इथलं वातावरणं जसं आहे तशी तुझी बहीण आहे. त्या वन पीस वाल्या मुलीच्या घरी सर्व ओपन माइंडेड असतील म्हणून ती तशी आहे.पण याचा अर्थ असा नाही की ती चूक आहे. तिच्यावर पण संस्कार चांगलेच झालेत फक्त ती मॉर्डन आहे. अमल्या हे एकविसावं शतक आहे; काळ बदललाय. जरा त्यांना आवडतं तसं राहायला तर राहू दे की. जर आपण आपल्या मना सारखं वागू शकतो तर त्या का नाही?”

अमोलला काही सुचत नव्हतं; तो अलगद बोलून गेला… “असुदे, अशा मूळे बलात्कार होतात हे माहीत आहे का तुला?”

विजू परत मंद हसत म्हणाला, “तुला काय माहित आहे ते सांग? एका सर्वेत अस लक्षात आलंय की भारतात 80 % पेक्ष्या जास्त रेप साडी आणि पंजाबी ड्रेस घालणाऱ्या मुलींवर आणि महिलांवर झाले आहेत व इतर 20%… म्हणून तू हा गैरसमज सोडूनच दे की मॉर्डन राहिल्याने बलात्कार होतात. तू पाहण्याची नजर बदल स्वतःची मग सगळं चांगलं दिसेल तुला.”

आजूबाजूला बसलेले सर्व लोक लक्ष पूर्वक ऐकत होते. अमोलला काय बोलावं तेच कळेना म्हणून तो म्हणाला, “तरी हे असे कपडे घालणं बर दिसतं का चार-चौघात?”

विजू होकारार्थी मान डोलवत म्हणाला, “अरे का बरं नाही दिसत..? छान दिसत की; आत्ता तर म्हणत होता तुला अशी गर्लफ्रेंड मिळावी म्हणून..! अमोल आपल्याला जशी आपली फ्रीडम हवी असते तशीच त्यांनापण हवी असते. तुझ्या घरी लहान बहिण आहे, किमान तू तरी असे गलिच्छ विचार करू नये.”

एक मिनिट सर्व शांत होतं… ही शांतता भेदत पुढें विजू जाणून-बुजून सर्वाना ऐकायला जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाला, “हे बघ अमल्या, आपण दोन महिन्या पासून मित्र आहोत पण मला तुला पाहून अस वाटलं नाही की तुझे विचार इतके फाटके असतील. जसं तुला त्यांच्या कडून अपेक्षा असतात ना, तशा त्यांनाही आपल्या कडून काही अपेक्षा असतात. आपण कधी, कुठे, कसं राहायचं यावर आपल्याला कोणी टोकलेल आवडत नाही मग त्याच्यावर का बंधन घालायचे? हे बघ मी काही खूप सभ्य वगैरे नाही, मी मुली पाहत नाही असंस नाही किंवा मी त्याच्यावर कंमेंट करत नाही असही नाही पण सौंदर्याचं कौतुक करणं वेगळं आणि शब्दांनी आणि नजरेने तिचा बलात्कार करणं वेगळं. कौतुक केलं तर त्यांना पण आवडतं. त्रास दिला तर कुणालाच नाही आवडत. सोप्या भाषेत सांगायचं तर मुलगी एक ताजमहाला सारखी असते; तिचं सौंदर्य बघ, तिचं कौतुक कर पण त्यावर दगड मारशील तर तो सुंदर ताजमहल कुठेतरी तूटेल आणि त्याचं खरं सौंदर्य खराब होईल. तुझ्या मनातले हे विचार सोड वेळे नुसार बदल, त्यांची रिस्पेक्ट कर तुलापण रिस्पेक्टच मिळेल. अमल्या आयुष्य खुप सुंदर आहे आणि मुली त्या पेक्षा जास्त सुंदर आहेत आणि हसल्यावर त्या आणखीनच जास्त सुंदर दिसतात मग हसू दे की त्यांना थोडं, वागू दे मना सारखं. आपण फक्त नजर आणि विचार चांगले ठेवायचे.” आणि थोडं हसून खट्याळ आवाजात पुढे म्हणाला, “असं राहून खूप मुली पाहायच्या; योग्य असा फ्लर्ट करायचा आणि जमलं तर पटवायच्या. तुला नाही कोणी अडवणार.” हे ऐकून ऐकणाऱ्यांमध्ये हशा पिकला….


“टेबल वर हात आपटत विजूने बिल मागवलं. अमोल गप्प बसला होता. त्याला त्याची चूक कळली होती. वेटर एका कव्हर मध्ये बिल घेऊन आला. विजूने खिशातून पाकीट काढत कव्हर ओपन केलं, तर बीलावर ₹00000 अमाउंट होती आणि पेनाने मोठ्या अक्षरात ‘thank you’ लिहून समोर एक स्मायली काढला होता. विजूने बिल हातात घेऊन काचेतून आत कॅशकाउंटर कडे पाहिलं. तिथे बसलेली एक मुलगी गोड smile करून डोळ्याने ‘thank you’ असं खुणावत होती”…

 

-D4mad

11 comments
  1. Sandip patil

    काय भन्नाट लिहिले बै…
    चक्क डोळ्यासमोर चित्र उभं राहिले बघ

    स्विट parfum..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *