आयच्या गावातचला हसू येऊ द्या

कलर’फूल…

गेले तीन वर्ष राईट स्वाईप करून बोटं विरली होती पण आशेची किरण,आरती, ज्योती, श्रद्धा, शांता कुणीच दिसली नाही; पण शेवटी अचानक एक दिवस परफेक्ट मॅच मिळालाच! खूप सुंदर मुलगी सापडली. (फोटो पाहून तर तसंच वाटलं). वयाने दोन वर्षाने लहान आणि दर्जेदार सिंगर; फायनली प्रयत्नांचं चीज झालं. आता उगाच वेळ घालण्याऐवजी डायरेक्ट मोबाईल नंबरच मागितला आणि तिनेही मुळीच नकार न करता दिला! ताबडतोब दुसऱ्या मिनिटाला इकडनं कॉल केला..

“हॅलो श्रेया…”

“Hey hi..” समोरून गोड आवाज आला…

“आपण भेटायच कधी..?” डायरेक्ट मुद्याचच बोलावं ह्या हेतूने…

“तु फ्री असशील तेव्हा भेटुयात..?” तीही मुळीच नकार न करता म्हणाली. (कदाचित रिकामटेकडी असेल)

आता अजून पेशन्स नव्हते, म्हणून उद्याचाच वार सांगितला; योगायोगाने तोही रविवार… (जास्त उशीर केला तर, ‘कही देर ना हो जाये’)

“रविवारी चालेल..?”

“हो! चालेल..” एका सेकंदाच्या आत तिने उत्तर दिलं.

“ok Done..”

पुढे बऱ्याच गप्पा झाल्या. (त्या तुम्हाला सांगणार नाही). कधी, कुठे, कसं भेटायचं ते ठरलं. दोन तासात प्रेम झालं. भरपूर प्रॉमिसेस, बरंच फ्युचर प्लॅनिंग झालं, मग काय? सब सेट! त्या दिवशी कळलं एका रात्रीत काहीही होऊ शकतं! दुपारी तीनला सुरू झालेला कॉल दुसऱ्या तारखेला पावणे दोन वाजता संपला. तेही नशीब तिला झोप आली म्हणून, नाहीतर उद्या भेटे पर्यत चालूच ठेवला असता. कॉल कट झाल्यावर कळलं फ्री कॉलिंग वाल्या सिम ऐवजी ऑफिस च्या पोस्टपेड सिम वरून लावला होता. बॉसच्या चार शिव्या मिळाल्या तरी चालेल पण “ती” नाराज व्हायला नको! आता फक्त राहीलं होतं ऑफिशिअली ‘प्रपोज! वो तो मेरे बाये हाथ का खेल है, आतापर्यंत मी कित्येक मुलींना प्रपोज केलंय, स्वप्नात!

सवयीप्रमाणे ११:०० वाजेपर्यंत आपल्या झोपेचा परमोच्च बिंदु असतो; किमान माझ्या तरी असतो! पण आज का कुणास ठाऊक साडेचारलाच जाग आली. या प्रकारासाठी मीच माझं नाव गिनीज बुक ऑफ वर्ड मध्ये लिहायला हवं; सिरियसली सकाळी साडेचार! घड्याळाकडे पाहून परत डोळे बंद केले. पुढे जाग आली थेट तिच्या कॉल मूळे.

सकाळी सव्वादहाला तिचा कॉल आणि सुरुवातच अशी,
“हॅलो पपुडी… झाला रेडी..?”

एक मिनिट मै तो शॉक! व द फ क! ये पपुडी कौन है बे.? साला हिने चुकीचा नंबर तर नाही लावला? मी काही बोलणार तेव्हढ्यात परत समोरून आवाज आला…

“अरे काय झालं..? बोल ना, आपण भेटतोय ना आज..? आपलं भेटायच ठरलं होतं ना, मी दहा मिनिट आधीच आले, ये तु लवकर आय ऍम वेटिंग…

कसंबसं स्वतःला सावरून म्हटलं, “हो हो आलो” असं म्हणून फोन कट केला..

रात्री जागरण झालं म्हणून उशीर झाला, आता काय करावं..? आयडिया..! पावसाळ्याचे दिवस म्हणजे विदाऊट अंघोळ जाण्याची संधी! भरपूर डिओ मारून डायरेक्ट प्रेस केलेले कपडे घातले. आठवणीने कार्ड खिशात ठेवलं. नुकताच पगार झाला होता त्यामुळे चिंता करायची गरज नव्हती. एव्हाना मेस, रूम आणि मित्राच्या उधारचे पैसे द्यायचे बाकी होते व सध्या हे महत्वाचं होतं. जेल लावून केस सेट केले, शूज घालून डायरेक्ट किराणा दुकान गाठलं आणि एक मोठ्ठं मानाचं चॉकलेट घेतलं. परंपरा आहे आपल्याकडे; मुलीला भेटायला जाताना तुम्ही आयुष्यात खाल्लं नसेल एवढं मोठं चॉकलेट घेऊन जाणे!

परत तिचा कॉल आला.. “पाच मिनिटात पोहचतो.” असं म्हणून कट केला…

घाईघाईत एक फुलांचं दुकान शोधलं. प्रपोज करायचं म्हणजे फुल महत्वाचं, अंगठी वगैरे नाही परवडत आपल्याला! समोर ठेवलेल्या पैकी एक फ्रेश गुलाबाचं फुल उचललं आणि पैसे देऊन निघालो. फुल बॅगेत लपवून ठेवलं, सरप्राईज! पोहचलो…

पिवळा बॅकलेस घालून तिने फुल्ल कोल्ड वातावरणाला हॉट करून टाकलं होतं. फोटोत पाहिल्या पेक्षा समोर जरा जास्त मेकअप दिसत होत. (“सुंदर” हा विषय वेगळा आणि “मेकअप” हा विषय वेगळा.) हाय हॅलो पासून समोर खूप गप्पा झाल्या.. पण प्रपोज करायला जमलंच नाही आणि शेवटी निघायचं ठरलं पण “बिल तु द्यायच नाही हं श्रेया”…

तिथून पुढे १२ ते ०३ मूवी ला जाण्याचा प्लॅन ठरला. पण तरीही, “तिकिटाचे पैसे तु द्यायचे नाही हं श्रेया”… एवढं करूनही तिथे सीट अशी मिळाली की… असो. शांतपणे पूर्ण movie पाहिली. गर्दीच एवढी होती कि फक्त मुव्हीच पाहावी लागली. प्रपोज इथेही झालं नाही.

पुढे लंचचा प्लॅन ठरला. तिने इंडियन फूड पासून मॅक्सीकन पर्यत सगळं try केलं. इथेही प्रपोज करायची संधी मिळाली नाही तरीही, “बिल तु मुळीच द्यायचं नाही”…

आता बराच खर्च झाला, दिवसही संपत आला म्हणून तिला घेऊन एका गार्डन मध्ये जाऊन एक निर्जन कोपरा गाठला. सर्वात आधी तिच्यासाठी सकाळ पासून घेतलेलं अन एव्हाना पाणी-पाणी झालेलं ते मोठं चॉकलेट दिल…(तिने हावरटा सारख लगेच एकटीने खाऊन संपवल) ती खुश दिसत होती… (एवढी खातीरदारी केल्यावर कोण नाराज राहील.) आणि हाच योग्य चान्स आहे म्हणून बॅगेतून गुलाबाचं फुल हळूस बाहेर काढलं आणि तिच्या समोर धरत, अंगातली सगळी शक्ती एकवटून “I Love You श्रेया” म्हणून टाकल…

पण आता ती खुश नाही झाली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता, डोळ्यातून आग ओकत होती… तिने तो चुरगळलेला गुलाब हातातून हिसकून जमिनीवर फेकून पायाखाली दाबला… आणि म्हणाली
“मला वाटलं तु माझ्या साठी परफेक्ट पार्टनर आहेस, पण तू असं करशील अशी अपेक्षा नव्हती.”

काय झालं काही काळतच नव्हतं.
“अरे श्रेया काय झालं..? मी प्रपोज करतोय..”

तिचा राग अजून डोक्यात गेला, ओरडून म्हणाली…
“गप्प बस एक शब्दही बोलू नको.”

परत डोकं खाजवत हिंमत करून विचारलं..
“पण चूक काय झाली माझी, ते तरी सांग.”

ती गहिवरलेल्या रडक्या आवाजात….
“काय केलं? पांढरा गुलाब मेलेल्या लोकांवर वाहतात आणि तु ते देऊन प्रपोज करतोय. मला माहितीये तू मुद्दाम केलं हे.”

ती तोंड वाकडं करून पाठमोरी होऊन निघाली.
“मला माहित नव्हतं , श्रेया ऐक की.. श्रेया…श्रेया”

ती निर्दयी इतकं पोटभर खाऊनसुद्धा क्षणभरही मागे वळून न पाहता निघून गेली. (खाल्ल्या मिठाला जागावं माणसाने) गुलाब गुलाब असतो राव…! त्यात काय लाल, पांढरा, गुलाबी, पिवळा, हिरवा? सगळे गुलाब सारखेच… कोणता कधी कुठे कसाही दिला तरी त्याला काय प्रॉब्लम आहे..? कुठलाही घ्यायचा आणि “हो” म्हणायचं. पण मुलींचे नखरेच फार हो. बेसिकच कच्च असेल तर असं होणारच !

-D4mad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *