आयच्या गावातचला हसू येऊ द्या

एक पहिली भेट…

रात्र-रात्रभर जागून केलेल्या चॅटिंग नंतर फायनली त्यांची डेट ठरली. दोघेही जॅम एक्सायटेड होते आणि डेटचा दिवस आला…

तो बिचारा महागडा परवडत नाही म्हणून स्वस्तातला पर्फ्युम मारून, उतावळा होऊन तिची वाट पाहत कॅफेमध्ये बसला होता. मित्राचे उसने मागून आणलेले घड्याळ आणि गॉगल दोन तासात परत करायचे होते. पहिली डेट असल्यामुळे काही कमी राहायला नको म्हणून रात्रभर जागून तयारी केली. बॉसला हात जोडून ‘काका दवाखान्यात लास्ट स्टेज ला आहेत’ असं सांगून त्याने सुट्टी सह थोडा ऍडव्हान्सही आणला होता. त्यातुन काही पैसे गुलाब आणि चॉकलेट घेण्यात गेले आणि गाडीत पेट्रोल टाकून आता जेमतेम उरलेले पैसे उरले होते. सी.सी.डी. पेक्षा स्टारबक्स कॅफे जास्त स्वस्त असतो असा गैरसमज घेऊन थाटात बसून तिची येण्याची वाट पाहत होता पण त्याचा हा गैरसमज लवकरच आयुष्यभरासाठी दूर होणार होता.

दुसरीकडे ती ही पहाटे उठल्यापासून तयारीला लागली होती. कुणाकडून माहित नाही पण गिफ्ट मध्ये मिळालेला ड्रेस घालून ऑटोने कॅफे कडेच येत होती. रात्रीच चोरून ताईचं ड्राय होत आलेलं नेलपॉलिश लावून घेतलं होतं. एक्सने दिलेली ज्वेलरी असल्यामुळे चिंता नव्हती. फक्त रिक्षा पुरते पैसे जमा केले आणि ठरल्या ठिकाणी आली. पोहचल्यावर नेहमीप्रमाणे चिल्लर साठी रिक्षावाल्या सोबत भांडण केलं आणि कामगिरी फते करुनच कॅफे कडे निघाली. मनात बरेच विचार चालू होते; ‘तो कसा असेल? काय रिऍक्ट करेल? काय बोलावं? आणि सर्वात महत्वाचं; तो बिल भरेल कि नाही?’ या आधी आलेल्या दांडग्या अनुभवा नुसार तो बिल भरेलच याची तिला खात्री होती पण ‘डर सबको लगता है, गला सबका सूखता है.’ तिच्या मोठ्या पर्स मध्ये रिक्षाच्या भाड्या व्यतिरिक्त एक रुपयाही शिल्लक नव्हता! विचार करत-करत ती कॅफे पर्यत आली आणि त्यांच्या एकमेकांशी नजरेला नजर भिडली…

आता अशा वेळेला मनात खूप चलबिचल चालू असते; मनात बरेच विचार येत असतात पण ते ओठांवर आणता येत नाहीत. पण जर कदाचित त्या गोष्टी, ते विचार आपल्याला ऐकता आले तर काय होईल? ते बघा… चला आता तुम्हाला यांच्या मनातले आवाज ऐकवतो… (ब्रॅकेटमध्ये मनातले आवाज)

दोघांची नजरा नजर झाली आणि दोघांनी एकमेकांना पाहून वरवरची गोड स्माईल दिली.
तो तिला पाहून : (अरेरेरेरे… शेवटी ज्याची भीती होती तेच झालं, ‘दिखाऊ माल फसवू धंदा’! इंस्टावर आलीया भट्ट दिसणारी पोर प्रत्यक्षात ‘भारती कपूर’ निघाली. असो, नॉट बॅड!)

आणि ती याला पाहून : (हे आहे व्हय ते माकड. फोटो तर कसले भारी काढतय. ब्युटी मोड ऑन करून काढत असणार. ये काळ्या! याच्या पेक्षा पहिला जास्त भारी होता, हरकत नाही. नसल्यापेक्षा बरा!)

ती त्याच्या समोर येऊन अलगद बसली. अशा वेळी मुली जाणूनबुजून स्लो मोशन मध्ये चालतात कि आम्हा मुलांना फक्त तसा भास होतो तेच कळत नाही. हाय-हेल्लो करून त्याने तिच्यासाठी आणलेलं चॉकलेट आणि गुलाब तिच्या स्वाधीन केलं… तिने देखील सवयीनुसार ‘हाऊ स्वीट’ वगैरे म्हणून त्याचं कौतुक केलं… (चला, रिक्षाचे पैसे वसूल झाले!) फॉर्मेलिटी म्हणून किंवा आपण ‘गरीब’ आहोत हे कळू नये म्हणून अधून-मधून या-या, यस, आय नो, ऍक्च्युली सारखे जाड, रटाळ पण इंग्रजी शब्द वापरले जात होते.
(च्यायला काय बोलावं काही सुचत नाहीये) “कशाने आलीस ?” कुठून सुरु करावं म्हणून ह्या प्रश्नाने त्याने सुरूवात केली.

तिने त्याच्या नजरेस नजर देऊन उत्तर दिलं, “कॅबने आले, खड्ड्यांमुळे मला रिक्षा बिलकुल सहन होत नाही.” (बरं झालं एकदाची शांतात मोडली, जाम अनकम्फर्टेबल वाटत होतं पण ह्याने पाहिलं तर नसेल ना मला रिक्षातून येताना? जर पाहिलं असेल तर… देवा वाचव रे…)

“उत्तम आणि ऑटो वाले खुप लुटतात आजकाल.” (तोंड पाहून वाटत नाही तू कधी कॅब मध्ये बसली असशील)

तिने होकारार्थी मान हलवली. (अरे मूर्ख माणसा हा कॅफे आपल्या वडिलांचा नाही, इथे फुकटात बसून गप्पा नाही मारता येत) “तु काही घेतलंस का? कॉफी वगैरे?”

तो नकारार्थी मान हलवत म्हणाला, “नाही तुझीच वाट पाहत थांबलो होतो, म्हटलं तू आल्यावर सोबतच घेऊयात. (आली मुद्यावर.. हावरट घेणारच आहे जरा थांब, श्वासतर घे) excuse me हॅलो…”

एक समवयस्क वेटर अगदी अदबतेने त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. तो वेटर फक्त अदबतेने उभा होता पण त्याच्या मनात भलतंच काहीतरी चालू होतं. (मला माहितीये तू रेग्युलर कॉफी घेशील कारण त्याशिवाय तुला काहीच परवडणार नाही आणि हि मुलगी शक्य तेवढी महागातली ड्रिंक घेईल. तुझ्या सारखे दिवसभरात कित्येक बकरे पाहतो मी)
तो मेनू कार्ड तिच्याकडे सरकवत “तू काय घेणार सांग.. ?” (देवा लक्ष असूदे, स्वस्तातली ऑर्डर करण्याची बुद्धी दे हिला)

ती त्याच्या हातातलं कार्ड घेत भर भर लिस्ट वर बोट फिरवत म्हणाली, “अरे मला काहीही चालेल” (बेटा मी घरूनच ठरवून आलीये की मी कॅपेचीनोच पिणार, फक्त बिल भरायच्या वेळेस ttmm करू नको नाहीतर मला भांडे घासावे लागतील इथे.) मला एक हॉट कॅपेचीनो, स्टँड नॉट शेक, टू स्पून चॉकलेट संडे विथ एक्स्ट्रा क्रिमी हॅजलनट सिरप.. That’s it.. तु काय घेणार?”

तिची ऑर्डर ऐकून त्याच्या बिचाऱ्याच्या शिट्या गुल झाल्या. त्याने पटकन तिच्या हातून मेनूकार्ड घेतलं आणि कॅपेचीनोचे प्राईज शोधायला लागला. कॅपेचीनोची किंमत पाहून त्याच्या शिट्या गुल झाल्या शेवटी वेटरने विचार केल्या प्रमाणे त्याने ऑर्डर दिली; पण वेगळ्या स्टाईलने. इज्जतीच्या प्रश्न होता म्हणून थाटात हातातलं घड्याळ मागे सरकवत ऐटीत म्हणाला, “आज माझा काही घेण्याचा विशेष मूड नाही, एक रेग्युलर कॉफी.” (च्यायला, लूट लिया लूट लिया…)

वेटर एक भुवई उडवत दिमाखात निघून गेला अर्थात त्याच्या मनासारखं झालं! इकडे या दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. सरकारी शाळेत शिकलेली पोरगी त्याच्याशी बोलताना चक्क पुणेरी मराठी बोलायचा प्रयत्न करत होती, फक्त प्रयत्न! आणि इंग्रजीत काठावर पास होणारा मुलगा तिच्याशी बोलताना चक्क इंग्रजी शब्द वापरत होता. दोघांचं एकमेकांवर इंप्रेशन मारण्यासाठीचं नाटक, दुसरं काय? असो, दोघे एकमेकांना ‘मी खूप हुशार आणि स्मार्ट आहे’ असं पुरेपूर पटवून देत होते. जगातले असतील नसतील असे पराक्रम जे कधीच कुणी पाहिले अथवा ऐकले नाहीत ते आज एकमेकांना सांगत होते. तेवढ्यात ऑर्डर आली. ती थाटात फ़र-फर करत पीत होती. कधी न भेटल्या सारखं तिने त्याच्या आधी ग्लास खाली केला. तो बिचारा कप हातात घेऊन तिच्याकडे कौतुकाने कमी भितीने जास्त पाहत होता. कसा बसा त्याने तोंड वाकडं करून तो कप रिकामा केला. गप्पा जवळपास झाल्याच होत्या. गप्पा कसल्या फक्त गोळीबार झाला होता, नुसते झूठ पे झूठ!

शेवटी निघायची वेळ झाली. त्याने मनातल्या मनात आधीच हिशोब लावून ठेवला होता. याने खिशाला हात लावला तेव्हढ्यात ती पर्स ची झिप उघडत ओरडली, “अरे थांब मी देते.” (देरे बाबा लवकर, हे मी फक्त फॉर्मेलिटीसाठी म्हणतेय माझ्याकडे काहीच नाही.)

त्याने पैसे दिले आणि बिल घेत म्हणाला “असुदे ग, नेक्स्ट टाइम तु दे !” (एवढीच बिल देणारी होतीस तर लवकर काढून द्यायचे की, कळतात हो आम्हाला सगळे नाटकं)

ती मंद हसत म्हणाली, “हो नक्की! पुढच्या वेळेस बिल मीच देणार, पण आता कॅफे वगैरे नको. नेक्स्ट टाइम बागेत भेटू. तिथे समोरच नाक्यावर फेमस वडापाव मिळतो तो खाऊयात.” (पुढच्या वेळेस मीच बिल देईल, पण कॉफीच नाही वडापावच! तु तो लूट गयो रे…)

तो म्हणाला “हो नक्की आता नेक्स टाइम बागेतच भेटू.” (आयच्या गावात मला कॅफेत चुना लावून स्वतः मात्र वडापावचा प्लॅन करून मोकळी, वाह!)

ती मोबाइल काढून चार बटनं दाबायचं नाटक करत म्हणाली, “मी ओला बुक करते.” (बरं झालं याने बिल दिलं. तसं पोरग चांगलंय. मस्त बोलतंय अन दिसतंय बी बरं… आता जरा खाली पाहून ओला बुक करायचं नाटक करते)

बिल पे करून ते बाहेर आले आणि तो म्हणाला, “भेटू नेक्स्ट संडेला बागेत. माझी गाडी पार्कींग मध्ये आहे सो मला ग्राउंड फ्लोरला जावं लागेल. तुझी कॅब इथे समोरच येईल, चल निघतो मी, छान वाटलं भेटून.” (तशी मुलगी वाईट नाही पण महागडी कॉफि पिते म्हणून पुढच्या वेळस हिला बिलकुल महागड्या ठिकाणी न्यायचं नाही.. बाकी अपनी लाईफ सेट है.)

तिने हसून “मलाही खूप छान वाटलं, भेटू लवकरच, बायबाय…” एकमेकांच्या डोळ्यात पाहत दोघांनी निरोप घेतला, आपापले ऐकू न येणारे पण ओरडून-ओरडून कल्लोळ करणारे मनातले आवाज घेऊन दोघे आपापल्या रस्त्याने निघून गेले…

हाहाहा… कमाल असतात हे मनातले आवाज! कायम बड-बड करत असतात. त्यांना ऐकता आलं असतं तर भन्नाट मज्जा आली असती पण त्याचबरोबर भांडणं देखील तेवढीच झाली असती. असो, ऐकायला येत नाही तेच बरे…

-D4mad

One comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *