आयच्या गावातचला हसू येऊ द्या

“अ”विवाहितांचा रविवार…

साधे पार्किंगचे दहा रुपये परवडत नाहीत म्हणून मॉल बाहेर रोडवर गाडी पार्क करणारे सर्व पुरुष कदाचित विवाहित असावेत (कारण त्यांच्यावरच ही वेळ येऊ शकते). मला पार्किंग परवडते पण माझ्याकडे गाडी नाही तो विषय वेगळा! रविवार हा बॅचलर मुलांसाठी गर्लफ्रेंड सारखा असतो ‘हवाहवासा वाटणारा’ आणि विवाहित पुरुषांसाठी ‘बायको’ सारखा; शक्य तितका त्याला टाळायचा प्रयत्न करावा वाटतो. हि गोष्ट मॉल मध्ये एक नजर फिरवल्या नंतर कळते… असो!
आता आपण आहोत सुप्रसिद्ध सिटी मॉल मध्ये, या समोर सेल्फी घेणाऱ्या ज्या मुली आहेत त्या फक्त तेवढ्याच कामा साठी इथे आल्या आहेत, सेल्फी काढायला! बाकी इथली आईस्क्रीम सुद्धा यांना परवडत नसेल (मलाही नाही परवडत). त्या समोरून येणाऱ्या काकू दर रविवारी इथे येतात; ‘अमुक अमुक नायिकेने तमुक तमुक चित्रपटात फलाण्या डिझाईनची नेसलेली साडी ट्राय करणे व किंमत विचारून माघारी फिरणे आणि शेवटी आठवडी बाजारातून त्या साडीची डुप्लिकेट विकत घेणे’ हा यांचा मुख्य छंद! या सगळ्या गर्दीत दुसऱ्या मजल्यावर तो फोनवर बोलणारा जो साधा सरळ मुलगा आहे तो मी आहे! (माझं कौतुक कुणी करत नाही म्हणून मलाच करावं लागतं, कायम!) बाय द वे मी कुणाची तरी वाट पाहतोय; कुणाची? तुम्ही स्वतःच बघा…
“अगं किती वेळ! मूवी सुरू होण्याची वेळ झाली… हम्म्म लवकर गाडी पार्क कर मी सेकंड फ्लोरवर वेट करतोय”. असं म्हणून रागरागात मी एक आईस्क्रीम घेऊन खात बसलो. ती (जिची मी वाट पाहतोय ‘ती’) जर लवकर आली तर परत तिलापन एक आईस्क्रीम घेऊन द्यावी लागेल म्हणून पटापट संपवून टाकली (कचरा पेटीत सर्व पुरावे टाकून नष्ट केले), तोंड वगैरे पुसून केस व्यवस्थित केले आणि परत इन्ट्री गेट कडे पाहत काचेच्या कठड्यावर दोन्ही हात ठेवून उभा राहिलो… अरे तुमची ओळख करून द्यायचीच राहिली! हे माझ्या शेजारी बाकावर बसलेली मंडळी दिसताय ना, ह्यांना ह्यांच्या बायकांनी इथे ‘पार्क’ केलंय आणि हे टोकण सारखे लहान-लहान बिल्ले त्याचे स्वतःचे चिल्ले पिल्ले आहेत! (हे तेच विवाहित पुरुष आहेत जे मॉल बाहेर रोड वर गाडी पार्क करतात, दहा रुपये न परवडणारे गरिब, कुणामुळे? ते विचारू नका!) आणि ह्याच्या बायका एक्सपेंसिव्ह शॉपिंग करायला गेल्यात, असा असतो विवाहित पुरुषांचा संडे! सांगायचा  हेतू एवढाच कि ‘लग्न झाल्यावर अशी आपत्ती येते, असो…

 

पाच मिनिटं नंतर…

मी दुसऱ्या मजल्यावरून खाली इंट्री गेट कडे पाहत तिची वाट पाहत होतो, तेवढयात लाईट क्रीम कलर च्या वनपीस मध्ये मॉल मध्ये इन्ट्री मारली… हातात छोटीशी पर्स (कदाचित जास्त पैसे नसतील म्हणून), मोकळे केस, डोळ्यावरचा काळा गॉगल केसांवर हेयरबेल्ट सारखा अडकवलेला; कानातले हेडफोन काढून घाईत पर्स मध्ये कोंबत होती. तिच्या पेन्सिल हिल्स चा आवाज सेकंड फ्लोरवर सुद्धा मला स्पष्ट ऐकायला येत होता. पुढे ती स्वयंचलित पायऱ्यावर (एस्केलेटरवर) उभी राहिली. तिची पाठमोरी आकृती मला स्पष्ट दिसत होती. भिर भिर करणारी तिची नजर तिच्या कडे पाहणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. तिने एकदा स्वतःच्या केसातून हात फिरवला आणि ते थोडे व्यवस्थित केले. पहिल्या फ्लोरला आल्यावर तीने झटकन दुसऱ्या फ्लोरच्या एस्केलेटरकडे धाव घेतली. यावेळी तिचा चेहरा माझ्याकडे होता. अलगद तिला वर येतांना पाहून मनाला अगदी हलकं वाटत होतं. ती जशी जशी वर येत होती तसा तसा तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. कानातल्या रिंग्स हलताना मस्त दिसत होत्या, परफेक्ट स्ट्रेट हेयर, ब्लॅक आयलायनरने डोळे आणखीनच कातिल दिसत होते, लाईट-लाईट टचअप, (लपवण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या नजरेने हेरलंच), एक खूप बारीक चमकणारी टिकली, क्रीम्सन रेड कलरची लिपस्टिक, वाढलेल्या नखांवर लाईट पिंक कलरचं नेलपॉलिश आणि त्यावर सिल्व्हर कलरचे छोटे छोटे स्टार्स, टोकदार भुवया (नुकतंच थ्रेडिंग केलं असणार) आणि गळ्यात बारीक चमकदार सिल्वर रंगाची चैन. एकंदरीत ऑल सेट! रेडी होण्यासाठी 2-3 तास मेकअपवर अथक परिश्रम घेतले असावेत. कारण त्याचाच परिणाम मला समोर दिसत होता…

वरती आल्या बरोबर तिने लांबूनच आवाज दिला, “बेबी चल लवकर खुप उशीर झालाय” एक क्षण मी तिला पाहून आणि ऐकून भारावूनच गेलो. पण तिच्या टप-टप करत समोर येणाऱ्या पावलांच्या आवाजाने लगेच भानावर आलो. डोक्यात गाणं वाजत होतं, ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ पण ते अर्धवटच राहीलं आणि अचानक…. माझ्या शेजारी बाकावर बसलेला एक मुलगा तिच्या जवळ जाऊन म्हणाला, “सोन्या किती उशीर”, आणि असं म्हणत त्याने माझ्या बालमनावर काय परिणाम होईल याचा विचार न करता तिला माझ्या समोर हग केलं (हे मी डोळे बंद करून लिहितोय). त्यांचं हे लब-लब खेळून झाल्यावर ते हातात हात घेऊन लास्ट फ्लोर वर निघून गेले. ते नजरेआड जाई पर्यंत मी त्यांच्या कडे पाहत होतो. अजूनही मनात गाणं वाजत होतं; पण दुसरं, “जा बेवाफा जा हमे प्यार नही करना.” आता कळलं रविवार बॅचलर मुलांसाठी का गर्लफ्रेंड सारखा असतो ते? सोडा (दारू सोबत घेतात तो नव्हे, ‘विषय सोडा’)! मी जिची वाट पाहतोय ती भवानी अजून पर्यंत आलीच नव्हती…

मी स्वतःला त्या प्रकारातून कसंबसं सावरलं आणि तेवढ्यात फोन केकाळायला लागला. मी रिसीव केला आणि समोरून आवाज आला, “कुठे आहेस तू…. मी पार्कींग मधून लिफ्टने डायरेक्ट वर आले… मूर्ख माणसा ये लवकर.” मी बिचारा पुढे बोलणारच तेव्हढ्यात तिने फोन कट केला. इज्जत काढतात या मुली; (बरं झालं कुणी पाहिलं नाही.) मान्य आहे तीने तिकीट काढलं पण म्हणून काय असं चिडायचं… मला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही..? मीपण मागच्या महिन्यात वडापावचे २० रुपये दिले होते.. पण मी कधीच असा attitude नाही दाखवत… मी शांतपणे वर गेलो. वर गेल्या बरोबर ती समोरच कमरेवर एक हात ठेवून तिच्या बॉयफ्रेंड सोबत उभी होती (लक्ष देऊन परत वाचा, ‘बॉयफ्रेन्ड’ सोबत, वि आर जस्ट फ्रेंड्स). इतका वेळ वाट पाहत थांबलो त्याचं कौतुक तर सोडा पण उलट “चल की लवकर, आधीच खूप उशिर झालाय” हे अस चिडून स्वागत केलं… मी मात्र शांत राहिलो कारण ‘इंक्रेडीबल्स 2’ च्या तिकिटांची व्यवस्था झालेली असली तरी पुढच्या महिन्यात ‘कारवां’ रिलीज होणार होता. म्हणून मी गप्प बसलो (जर शांत बसल्याने पुढच्या रविवारच्या तिकिटांची व्यावस्था होणार असेल तर ‘दोन गोष्टी’ ऐकायला काय प्रॉब्लम आहे..) आणि तसही माझा स्वभाव खुप शांत आहे…( लाईक, नारायण..नारायण…)

आम्ही आत गेलो तेव्हा मुव्ही चालू झाली होती. एका माझ्यासारख्या काळ्या तोंडाच्या बॅटरीवाल्याने तिकीट पाहून सीट सांगितलं (कदाचित अंधार होता म्हणून काळा दिसत असेल, असं कुणावर हसू नये). सीट जवळ गेलो अन पाहतो तर काय…? @#**चा घो.. ‘वनपिस’ आमच्या समोरच्या सीटवर तिच्या बॉयफ्रेंडच्या खांद्यावर डोकं ठेऊन मूवीचा आनंद घेत होती… मेरा दिल फीर से रो पडा, “कशी नशिबानं थट्टा आज मांडली” वगैरे वगैरे…

आसा काहीसा असतो (माझ्यासारख्या) अविवाहितांचा रविवार!

इस कहानीके सभी पात्र और घटनाये काल्पनिक है, तरी असे आढळून आल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा…

 

-D4mad

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *